पिंपळगावचे मुलींचे लेझीम पथक तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम – हनुमान व्यायाम मंडळांने जपली लेझीमची परंपरा

पिंपळगावचे मुलींचे लेझीम पथक तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम
– हनुमान व्यायाम मंडळांने जपली लेझीमची परंपरा
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव :
हालगी व कैच्याळच्या आवाजावर बघणाऱ्यांनाही ठेका धरायला लावणारा पारंपारिक खेळ म्हणजे लेझीम होय. आता लेझीम काळाच्या ओघात मागे पडत चालले असले तरी पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी तसेच शालेय मुलींनी या खेळाची परंपरा जपली आहे. यानिमित्ताने या खेळाचे संवर्धन ग्रामस्थ करताना दिसत असून नुकतेच पिंपळगाव येथील हनुमान व्यायाम मंडळ संचलित मुलींच्या लेझीम पथकाने तिरवडे (ता.भुदरगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यामध्ये पिंपळगावच्या लेझीम पथकाचा ठसा उमटवला आहे.
लेझीम हे महाराष्ट्रातील लोकनृत्य म्हणून ओळखले जाते.हालगी व कैच्याळच्या ठेक्यावर लेझीम खेळताना गोलाकार फेर धरून नृत्य करतात. वेगवेगळे उलट-सुलट वर्तुळे रचत पुन्हा गिरकी घेऊन पूर्व पदावर येतात.दोना-चाराच्या रांगा करून संचलन यामधील खेळाडू हातामध्ये लेझीम घेऊन करतात.या सर्व हालचालीमध्ये एकप्रकारची लयबद्धता असते.उड्या मारणे, बसणे,वाकणे,पावले तालासुरात मागे पुढे करीत लयबधरीतीने मागे- पुढे सरकणे अशा हालचालींचा यात समावेश असतो. लेझीम हालगी व कैच्याळच्या तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत खेळणाऱ्याचे दोन्ही हात गुंतलेले असल्यामुळे हातांच्या हालचाली नियंत्रित होतात.याची प्रत्येक हालचाल लेझीमच्या ठेक्याची व नाद लयबद्धतीशी सुसंगत असते. लेझीम नृत्य हलगी,ढोल,ताशा,बँडच्या साथीने केले जाते. सर्व हालचाली लयबद्ध होत असल्यामुळे त्यातआकर्षकता निर्माण होते.
अशा या खेळाची परंपरा जोपासण्याचे काम भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे हनुमान व्यायाम मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. पिंपळगाव येथे गेली सहा वर्षापासून मुलींचे लेझीम पथक तयार करण्यात आले आहे. या लेझीम पथकामध्ये साधारणतः 16 मुलींचा संघ तयार करण्यात आला आहे. येथील शालेय मुली दिवसभर शाळेला जातातआणि रात्री काहीवेळ हनुमान व्यायाम मंडळाच्यासमोर लेझीम खेळाचा सराव करतात. गेले अनेक वर्षापासून पिंपळगावमध्ये जोपासलेली लेझीम खेळाची परंपरा या मुलींनी जपली असून त्यांना हनुमान व्यायाम मंडळाचे वस्ताद शिवाजी सुर्वे व वस्ताद बाजीराव दिवटे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
येथील मुलींनी लेझीमचा उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला असून ही बाब कौतुकास्पद आहे. नुकत्याच तिरवडे येथे झालेल्या तालुकास्तरीय लेझीम स्पर्धेत संपूर्ण भुदरगड तालुक्यातून केवळ पिंपळगावच्या मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला होता. संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत येथील मुलींच्या लेझीम संघाने लेझीम खेळाचा वेगळा ठसा उमटवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या मुलींच्या लेझीम पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
—-
–पिंपळगावच्या लेझीम पथकास 50 वर्षांची परंपरा-
पिंपळगावचे मुंबईकर गिरणी कामगार मंडळी विशेषतः डिलाईड रोड येथे सायंकाळी करमणुकीचे साधन म्हणून विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळायचे.त्यामध्ये दांडपट्टा, लेझीम,लाठीकाठीचाही समावेश असायचा.गिरणी कामगार गिरणी बंद पडल्यानंतर निवृत्तीनंतर गावी आले. त्यांना हनुमान व्यायाम मंडळाचे वस्ताद कै.शंकर दिवटे व वस्ताद दत्तात्रय आरबुने यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर सुरू झालेली लेझीमची ही परंपरा आजही कायम सुरु आहे.येथील हनुमान व्यायाम मंडळाचे लेझीम पथक विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात सतत अग्रेसर असते विशेषता लग्न समारंभ,गणेशोत्सव कार्यक्रम, मिरवणुका तसेच माही- यात्रा यामध्ये लेझीमला मोठ्या प्रमाणात आजही मागणी टिकून आहे.त्यामुळे जुन्या जाणत्या मंडळींनी लेझीम खेळाची परंपरा जोपासण्याचे काम केले आहे. त्यामुळे आजही पारंपारिक खेळ जतन करण्याचे काम जुने- जाणती मंडळी करत आहेत.त्यामुळे शासनाने या लेझीम खेळाची दखल घेऊन कलाकारांना मानधन सुरू करून या पारंपारिक खेळास प्रोत्साहन द्यावे अशी मागणी वस्ताद शिवाजी सुर्वे व बाजीराव दिवटे यांनी केली आहे.