गारगोटीतील केवळ पाच महिन्याच्या बालकाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी: उपजिल्हा रुग्णालय व बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे यश

गारगोटीतील पाच केवळ महिन्याच्या बालकाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी:
उपजिल्हा रुग्णालय व बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे यश
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ग्रह भेटीत मिळून आलेल्या एका पाच महिन्याच्या बालकाची जन्मजात मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि बाल स्वास्थ्य पथक कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दिनांक एक एप्रिल 2013 पासून सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी अंगणवाडी येथे वर्षातून दोन वेळा करण्यात येते व सहा वर्षे ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करण्यात येते. भुदरगड तालुक्यामध्ये एकूण दोन पथके कार्यरत असून या आरोग्य तपासणी मधून संदर्भित केलेल्या बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटी स्तरावर संदर्भसेवा दिली जाते. या बालकांना शस्त्रक्रिया करायची गरज असेल त्यांना ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया शिबिरे राबवण्यात येतात.
शौर्य किरण कदम (वय पाच महिने) या बालकाची गृहभेट देऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक क्र. एक यांचामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळ्यांचा तपासणी दरम्यान दोष आढळून आला. यासाठी सदर बालकाला सीपीआर कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी पीडियाट्रेशन सर्जन यांच्याकडे संदर्भित करण्यात आले असता दोन्ही डोळ्यांचा जन्मजात मोतीबिंदू असे रोग निदान झाले. त्याला पुढील उपचारास नंदादीप हॉस्पिटल सांगली येथे डॉक्टर पटवर्धन यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथे महात्मा फुले योजनेअंतर्गत दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. सदर शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, यांच्या मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर पल्लवी तारळकर, जिल्हा समन्वयक प्रज्ञा संकपाळ, केळुसकर, भुदरगड आरबीएसके च्या दोन्ही पथकातील वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्रमांक एक अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथील डॉक्टर मीनाक्षी वारुशे, वैद्यकीय अधिकारी यांचा बरोबर डॉक्टर ऋषिकेश हजारे, वैद्यकीय अधिकारी मधुबाला जाधव, औषध निर्माण अधिकारी श्रीमती दिपाली हांडे परिचारिका आदिनी परिश्रम घेतले.