कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी संघटित व्हा – आम. प्रा. जयंत आसगावकर

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी संघटित व्हा
– आम. प्रा. जयंत आसगावकर
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
महाराष्ट्रात गेली तीन दशके व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, स्वंयरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महत्वाकांक्षी अभ्यासक्रमांकडे शासनाच्या वक्रदृष्टीने घरघर लागली आहे. शासनकर्त्याकडून दुजाभाव सुरू आहे. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व घटकांनी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी संघटित होत एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन पुणे विभाग शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. मेळाव्यात कृती समितीचे वतीने जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. जे. फिग्रेडो यांनी कोल्हापूर येथे विद्या भवन येथे आयोजित मेळाव्यात आम. आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रा. कार्जिनी होते.
आम. आसगावकर पुढे म्हणाले, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांना महत्वपूर्ण स्थान निर्माण झाले असताना केवळ शासनकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या आडमुड्या धोरणाने ही योजना संकटात सापडली आहे. शासन दरबारी योजनेला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. कौशल्य विकास विभागाचे मंत्री व अधिकारी या महत्वकांक्षी अभ्यासक्रमांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याऐवजी अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. शिक्षकांना समायोजनाचे गाजर दाखवून योजनेच्या उद्देशाला व विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपली मानसिकता बदलून यापुढेही संघटितपणे व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला पाहिजे.
डॉ. प्रा.कर्जिणे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात इयत्ता सहावी पासून कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण देणे अभिप्रेत आहे. त्यासाठी शासनकर्त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० ला
दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा राज्यांनी विरोध केला आहे. मात्र महाराष्ट्रात प्रभावीपणे कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी केली जात असताना व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाची गळचेपी होत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वकांक्षी व्यवसाय शिक्षण योजनेला उर्जितावस्था मिळाली पाहिजे याकडे लक्ष वेधले.
प्रास्तविक कृती समितीचे अध्यक्ष प्रा फ्रिगेडो यांनी केले. आभार सचिव प्रा एन डी बोडके यांनी मानले. सूत्रसंचलन खजानीस प्रा. विकास पाटील यांनी केले. मेळाव्यास कृती समितीचे सदस्य डॉ. प्रा. सुनील देसाई, विनोद उत्तेकर, प्रा. संजय घाटे, एम. डी. चव्हाण, प्रा. कोरे यांच्यासह व्यवसाय शिक्षण विभाग अभ्यासक्रम शिक्षक उपस्थित होते.