जिल्हाताज्या घडामोडी

श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार श्रीमती सरोज एन. डी. पाटील यांना जाहीर; : २५ डिसेंबर रोजी वितरण!

श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार श्रीमती सरोज एन. डी. पाटील यांना जाहीर;

२५ डिसेंबर रोजी वितरण!

सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
येथील विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संस्थेच्या माजी अध्यक्ष, श्री. वीरशैव को. ऑप. बँकेंच्या माजी अध्यक्ष कै. रत्नमाला घाळी यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा नारीशक्ती पुरस्कार यावर्षी श्रीमती सरोज( माई) एन. डी. पाटील यांना जाहीर झाला आहे.

शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि विशेषकरून स्त्री उध्दारविषयक विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तव्याभिमुख, उपक्रमशील महिलाना कै. श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार दि. २५ डिसेंबर रोजी त्यांच्या जयंती दिनी दिला जातो.

यावर्षीचा पुरस्कार श्रीमती. सरोज एन. पाटील (माई), कोल्हापूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पार्ले येथील कामगार व दलित वसाहतीतील मुलांसाठी किमान शिक्षणाची सोय होणेसाठी सुरू केलेली शाळा, झोपडप‌ट्टीतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका, व्यायाम साधने उपलब्ध करून देणे, गरीब व होतकरू मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना, मुलांसाठी जोतिबा फुले दत्तक योजना यशस्वीपणे राबविली आहे. सार्वजनिक परिसर सुशोभीकरण, पर्यावरण संतुलन, वृक्षलागवड व स्त्री प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी शासकीय व निमशासकीय आणि संस्थात्मक पातळीवर अनेक उपक्रम राबविले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील अंधश्रध्दा निर्मूलन समितींच्या अध्यक्ष, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य म्हणून यशस्वीपणे कामकाज केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव होण्यासाठी
कै. श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती २०२५ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व मानपत्र व रोख २५०००/- रू असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दि. २५ डिसेंबर,२०२५ रोजी दुपारी 3.30 वाजता डॉ. घाळी कॉलेज मध्ये वितरण होईल.
यापूर्वी श्रीमती नसिमा हुरजुक, डॉ. साधना झाडबुके, श्रीमती शोभाताई कोरे,डॉ. नंदाताई बाभूळकर, कांचनताई परुळेकर आदिना नारीशक्ती पुरस्कार देऊन  गौरविले आहे. अशी माहिती डॉ. सतीश घाळी यांनी दिली. यावेळी ॲड. बी.जी. भोसकी, विकास पाटील, अरविंद कित्तुरकर, गजेंद्र बंदी, किशोर हंजी, महेश घाळी, प्राचार्य दत्ता पाटील यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button