आपणआमदार नसतो तर गडहिंग्लज भकासच राहिले असते; जनता दलाने गडहिंग्लजचे वाटोळे केले मंत्री मुश्रीफ

आपणआमदार नसतो तर गडहिंग्लज भकासच राहिले असते;
जनता दलाने गडहिंग्लजचे वाटोळे केले
–मंत्री मुश्रीफ
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
गेली अनेक वर्षे गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाची सत्ता आहे. परंतु विकासाच्या दृष्टीने त्यांचे एकही पाऊल पुढे पडले नाही आमच्या सुदैवाने पालिकेवर प्रशासक आल्यामुळे कोट्यावधीचा निधी विकास कामांच्या पूर्ततेसाठी आणता आला. मी जर या विभागाचा आमदारच नसतो तर गडहिंग्लज भकास राहिले असते. जनता दलाने शहराचे वाटोळे केले. त्याची पुनरावृत्ती करायची नसेल तर गडहिंग्लजच्या जनतेने राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि तीन ‘अ’ मधील उमेदवार सुजाता मांगले यांना प्रचंड मताने निवडून द्यावे. असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे केले.
गडहिंग्लज नगरपालिकेच्या स्थगित करण्यात आलेल्या 3 अ मधील उमेदवाराच्या सांगता प्रचार सभेत मुश्रीफ बोलत होते.
ते पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेले दोन दशकाहून अधिक काळ मी कार्यरत आहे. विविध विभागाच्या माध्यमातून विकास कामाचा डोंगर मतदार संघात उभारला आहे. बांधकाम विभाग कामगारांच्या मुलांना आर्थिक मदत यासह गंभीर आजारावरील रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कागल आणि गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी मी कोट्यावधीचा विकास निधी खेचून आणला आहे.
कार्यकर्ते हेच माझे खरे शक्तिस्थान आहे. त्या बळावरच आमदार व मंत्री म्हणून कार्य करता आले असे स्पष्ट करीतमुश्रीफ म्हणाले निवडून आल्यानंतर गडहिंग्लज शहराच्या अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्थेसह, सांडपाणी व कचऱ्याची निर्गत होण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातील. नेतृत्व कसे असावे हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून आम्ही दाखवून दिले आहे. संकेश्वर ते बांदा या मार्गाचे काम पूर्ण झाले असून मतदारसंघात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आपला नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. कोणतेही सामाजिक काम करताना कार्यकर्त्यांनी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे. विकासाची आस असणारे नेतृत्व तयार झाले तरच गावचा विकास होतो याकडे लक्ष वेधत मुश्रीफ म्हणाले गडहिंग्लज शहरात कागलच्या धरतीवर तीन हजार घरकुले उभारून सर्वसामान्यांना निवारा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. गडहिंग्लज नगरपालिकेची पूर्ण सत्ता राष्ट्रवादीलाच मिळणार आहे यात कोणतेही दुमत नाही आपला विजय पक्का असून तीन ‘अ ‘च्या उमेदवार सुजाता मांगले यांच्या घड्याळ चिन्हावर खटाखट बोट दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन देखील मुश्रीफ यांनी केले. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, किरण कदम ,उदय जोशी, नागेश चौगुले, महेश तुरबठमठ, गुंडोपंत पाटील, सतीश पाटील, महेश संलवादे, अमर मांगले, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सांगता प्रचार सभेत उपस्थित होते.