जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विट्याजवळ शोभेच्या दारुचा स्फोट, दोघांचा मृत्यू: पाच किलोमीटर परिसरातील जमिन हादरली

विट्याजवळ शोभेच्या दारुचा स्फोट, दोघांचा मृत्यू

पाच किलोमीटर परिसरातील जमिन हादरली

सिंहवाणी ब्युरो / खानापूर :
भाळवणी (ता. खानापूर) येथे सोमवारी सकाळी फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना सायंकाळी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. शोभेच्या दारूचा स्फोट इतका मोठा होता की, पाच किलोमीटर परिसरातील जमिन हादरली, तर गावातील काही घरांच्या खिडक्याच्या व मोटारीच्या काचा फुटल्या.

विट्याजवळ असलेल्या भाळवणी बसस्थानकाजवळ मुल्ला फायर वर्क्स हा शोभेची दारू तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात सोमवारी सकाळी दहा वाजणेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यावेळी आफताब मन्सूर मुल्ला (वय ३० रा. भाळवणी) व अमिर अमर मुलाणी (वय ४० रा. चिंचणी-अंबक) हे दोघे शोभेची दारू कुटण्याचे काम करत होते. अचानक झालेल्या दारूच्या स्फोटात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना सांगलीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला.

स्फोटामुळे फटाके निर्मिती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडवरील लोखंडी पत्रे घटनास्थळापासून चारशे ते पाचशे फुटावर जाउन कोसळले. आगीची माहिती मिळताच विटा नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचा स्फोटामुळे घटनास्थळापासून पाच किलोमीटरचा परिसर हादरला. तर गावातील घराच्या काही खिडक्याची तावदाने यांना तडा गेला. तसेच काही मोटारीच्या काचांनाही तडे गेले. स्फोटाच्या घटनास्थळापासून १०० फूट अंतरावरील घरात कपाटातील भांडीही खाली कोसळली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button