गावाबाहेरच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात घेणे खूप गरजेचे- सरोज एन. डी. पाटील : कै. रत्नमाला घाळी नारी शक्ति पुरस्काराने श्रीमती पाटील सन्मानित

गावाबाहेरच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात घेणे खूप गरजेचे- सरोज एन. डी. पाटील
कै. रत्नमाला घाळी नारी शक्ति पुरस्काराने श्रीमती पाटील सन्मानित
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
पुरुषप्रधान संस्कृती मुळे
स्त्रियांचे कर्तुत्व फुलत नव्हते परंतु महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, यासारख्या सामाजिक विचारवंतांच्यामुळे स्त्रियांच्या पायाची बेडी तुटली.माणसाच्या आयुष्यात शिक्षणाचे स्थान फार महत्त्वाचे आहे.शाळा, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. वंचित, अपेक्षित, गावाबाहेरच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात घेणे खूप गरजेचे आहे. असे प्रतिपादन सरोज ( माई) एन.डी. पाटील यांनी केले.
गडहिंग्लज येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानचा कै. रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार सरोज पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज पालिकेच्या नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महेश तुरबतमठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरोज पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भेडसावणाऱ्या विविध समस्या संदर्भात चिंता व्यक्त करीत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वच घटकांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.उत्तम शिक्षण हेच खऱ्या अर्थाने टॉनिक असते. त्यामुळे आयुष्यात कणखर होता येते. प्रथमता शाळेत मुख्याध्यापकांच्याकडे प्राण असला पाहिजे तरच शिक्षकांच्या मध्ये प्राण राहतो आणि मग मुलांच्या मध्ये प्राण येतो तीच शाळा खऱ्या अर्थाने जिवंत असते. याकडेही श्रीमती पाटील यांनी लक्ष वेधले.
पुरस्कार प्रदान संस्थाध्यक्ष डॉ सतीश घाळी यांच्या हस्ते ,उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मानपत्र वाचन प्रा शिवाजी पाटील यांनी केले .स्वागत सहसचिव गजेंद्र बंदी यांनी केले. आभार सचिव बाबूराव भोसकी यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. आश्पाकभाई मकानदार, प्रा. आश्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.