भाकडकथा सोडा, वैज्ञानिक पुनर्जन्म घ्या- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने : इंचनाळमध्ये नेत्रदान चळवळीचा वर्धापनदिन

भाकडकथा सोडा, वैज्ञानिक पुनर्जन्म घ्या-
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने :
इंचनाळमध्ये नेत्रदान चळवळीचा वर्धापनदिन
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
सध्या सर्वात गतीने कोणती गोष्ट पसरत असेल तर ती अंधश्रद्धा. समाजात पूर्वीही विज्ञान ऐकले जात नव्हते आणि आताही तीच परिस्थिती आहे. पण, अंधश्रद्धेच्या भाकडकथा सोडा, नेत्रदान-अवयवदानातून वैज्ञानिक पुनर्जन्म घ्या, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथे मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा तेरावा वर्धापनदिन झाला. याप्रसंगी डॉ. लहाने बोलत होते. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतच्या आवारात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, वर्षभरातील २७ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. लहाने यांनी नेत्रदान चळवळीच्या कार्याचे, कार्यकर्त्यांचे कौतुक करीत हे अद्वितीय काम देशपातळीवर उजेडात यावे यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. डॉक्टर या नात्याने लोकांनी डोळ्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. मोबाईल वापराचा दुष्परिणाम तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट करून मुलांना यापासून का दूर ठेवावे याबाबत उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले. स्वतःच्या कष्टप्रद वाटचालीचा इतिहास सांगताना लोकांच्या भावनेला हात घालत चांगुलपणाची शिकवण दिली. त्यामुळे ऐन थंडीतही हजारोंचा जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन बसून राहिला होता. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक विचाराला दाद देत होता.
डॉ. सदानंद पाटणे यांचे भाषण झाले. चळवळीत मिळालेल्या नेत्रदानातून नेत्राप्रत्यारोपणाद्वारे दृष्टी मिळालेल्या बाळासाहेब नाईक यांनी जगण्याला पुन्हा अर्थ दिल्याबद्दल चळवळीविषयी ऋण व्यक्त केले. रोजगाराच्या माध्यमातून आयुष्यात आनंद पेरण्याचे काम अंधाच्या रोजगार केंद्राच्या माध्यमातून झाल्याचे रेश्मा हुंदळेकर यांनी सांगितले. रोहित विभुते, धोडीबा कुंभार, मनोहर मगदूम, द्रौपदा पाटील, मनोहर नांगरे, आक्काताई गोते, अभिनव कांबळे, बायाक्का रायकर, गंगुबाई कानडे, नारायण कुपन्नावर, अरविंद चव्हाण, शामराव गाडीवड्ड, विठाबाई पाटील, एस. आर. पाटील, बंडू माने, रत्नाबाई सावंत, सुशीला पाटील, ताराबाई कागवाडे, गंगुबाई बाटे, लता मगदूम, सुशीला पाटील, शांता गड्डी, सरस्वती पाटील, आप्पा केसरकर, सिताराम जाधव, अमृत शिंत्रे, शांताबाई घोटणे या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा आशपक मकानदार यांनी सुत्रसंचालन केले. इंचनाळसह विविध गावातील चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
* शासनस्तरावर योग्य दखल हवी…
डॉ. तात्याराव लहाने म्हणाले,””अत्याळ सारख्या छोट्या खेड्यातून सुरु होऊन आजूबाजूच्या अनेक खेड्यात पसरत असलेली आणि रुजत चाललेली नेत्रदान चळवळ देशात आदर्शवत आहे. याचा आदर्श देशातील सर्वच खेड्यांनी घ्यायला हवा. या वेगळ्या कामाची शासन स्तरावर योग्य दखल घायला हवी.”