जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीमाभागातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून छळ : पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव : राज्य महिला आयोगाकडे तक्रार;

सीमाभागातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून छळ :

पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव
राज्य महिला आयोगाकडे तक्रार;

सिंहवाणी ब्युरो / जत :
जत तालुक्यात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरला पोस्टमार्टम रिपोर्ट न बदलल्याने वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच पैसे मागितले जात आहेत. ‌‘लाचलुचपत‌’मध्ये अडकवण्याची खोटी भीती दाखवून छळ केला जात असल्यामुळे छळाला कंटाळून या महिला डॉक्टरने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान, डॉ. तळेकर यांनी केलेल्या तक्रारीबाबत बुधवारी (दि. 31) बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी ‌वार्ताहरांशी बोलताना दिली. डॉ. नम्रता तळेकर यांची दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशन कार्यकाळात डॉ. नम्रता यांनी पोस्टमॉर्टम केले होते. त्याचा रिपोर्ट तयार केला होता. परंतु जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास सांगितले. परंतु डॉ. नम्रता यांनी त्याला नकार दिला. प्रसूती रजेवर असताना रिपोर्ट बदलण्याबाबत त्यांचा वरिष्ठांकडून छळ सुरूच होता. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर, त्यांच्याकडे वरिष्ठांनी पैसेही मागितले होते, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नावाचा खोटा वापर करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अनेकवेळा आत्महत्येचा विचारही मनात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, प्रसूती रजा, वेतनवाढ, पदोन्नती आणि सेवा लाभांची पूर्ण भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button